स्वेरीमध्ये ‘ईलाइट क्लब २०२६-२७’चे उद्घाटन; ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूर प्रतिनिधी: कार्तिक औसेकर, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ईलाइट स्टुडंट क्लब २०२६-२७’ चे उद्घाटन तसेच ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
‘एक्सप्लोर, इनोव्हेट, इन्स्पायर’ या संकल्पनेवर आधारित ईलाइट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, संघभावना तसेच नाविन्यपूर्ण विचार विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत विविध तांत्रिक उपक्रम, प्रकल्प, कार्यशाळा आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांमध्ये सहभागी होण्यासाठी या क्लबच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे पी.ई.एल. रोबोटिक्स, उरण, मुंबईचे प्रणित भोईर, पी.ई.एल. रोबोटिक्सचे प्रमुख एस. म्हसकर, विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवलकर, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, सहविभागप्रमुख प्रा. एम. बिश्वास, समन्वयिका प्रा. प्राजक्ता तुपारे यांच्यासह विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगती, वैज्ञानिक संशोधन आणि आधुनिक अंतराळ तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यातील संधींची माहिती घेतली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासोबतच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
