मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 22 November 2026

दौंडमध्ये महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल!

nndlivenews@gmail.com वार्ताहर
November 4, 2026 1 मिनिट वाचन 9 वाचन

महिलेचे फोटो परस्पर पोस्ट करून गावातील नागरिकांशी अश्लील चॅटिंग केल्याचा आरोप; सायबर तपासातून आरोपीचे नाव समोर

दौंड | प्रतिनिधी सोशल मीडियाचा वापर करून महिलांची बदनामी करण्याचे प्रकार समोर येत असतानाच दौंड तालुक्यातील मलठण येथे महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तिचे फोटो पोस्ट केल्याचा आणि गावातील नागरिकांशी अश्लील चॅटिंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात स्वप्निल साहेबराव देवकाते (रा. मलठण, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्योती अरुण लवटे (वय ३८, रा. मलठण) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार ७ जुलै २०२६ पासून ऑगस्ट २०२६ या कालावधीत वेळोवेळी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी ज्योती लवटे या स्वतःच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट वापरत होत्या. ७ जुलै २०२६ रोजी गावातील भगवान वाघमोडे यांनी त्यांच्या नावाचा वापर करून कोणीतरी बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केल्याची माहिती त्यांना दिली. या अकाउंटवर त्यांचे काही फोटो पोस्ट करण्यात आले असून, त्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट्स केल्या जात असल्याचेही सांगण्यात आले.

त्यानंतर ज्योती लवटे यांनी आपला मुलगा अजय याच्या मदतीने इन्स्टाग्रामवर संबंधित अकाउंट शोधले. त्यावेळी त्यांच्या नावाने `jyoti_lavate7` आणि `jyoti538788` अशी दोन बनावट अकाउंट तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही अकाउंटवर त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरील फोटोंचे स्क्रीनशॉट काढून पोस्ट करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संबंधित दोन्ही बनावट अकाउंटची माहिती मिळाल्यानंतर ज्योती लवटे आणि त्यांच्या मुलाने इन्स्टाग्रामवर रिपोर्ट करून ती अकाउंट बंद केली. मात्र, ऑगस्ट २०२६ मध्ये पुन्हा त्यांच्या नावाने `jyoti.lavate9` या नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आल्याचे समोर आले.

या नव्या अकाउंटवरही त्यांचे काही फोटो पोस्ट करण्यात आले होते. तसेच या अकाउंटच्या माध्यमातून गावातील नागरिकांशी अश्लील स्वरूपात चॅटिंग करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. या प्रकारामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत ज्योती लवटे यांनी दौंड पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण सायबर पोलिसांशी संपर्क साधला. बनावट इन्स्टाग्राम अकाउंटबाबत तांत्रिक माहिती मिळविण्याची प्रक्रिया करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, `jyoti.lavate9` हे बनावट अकाउंट ७३८७३५६००३ या मोबाईल क्रमांकावरून लॉगिन झाल्याचे निदर्शनास आले.

तपासा सादरम्यान संबंधित मोबाईल क्रमांकाचा प्रीपेड ग्राहक अर्जही पोलिसांना प्राप्त झाला. हा क्रमांक साहेबराव गणपत देवकाते यांच्या नावावर असल्याची माहिती फिर्यादीला पोलिसांकडून मिळाली. मात्र, सदर मोबाईल क्रमांक त्यांचा मुलगा स्वप्निल साहेबराव देवकाते वापरत असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

स्वप्निल साहेबराव देवकाते याने वडिलांच्या नावावर असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून आपल्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या अकाउंटवर परवानगीशिवाय आपले फोटो पोस्ट केले आणि स्वतःचे खरे अकाउंट असल्याचे भासवून गावातील नागरिकांशी अश्लील चॅटिंग केली, असा आरोप ज्योती लवटे यांनी फिर्यादीत केला आहे.

या प्रकारामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आली असून बदनामी झाल्याचे नमूद करत त्यांनी संबंधित तरुणाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७८(२), ७९, ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६(डी) आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील तांत्रिक पुरावे, बनावट अकाउंटचा वापर आणि संबंधित व्यक्तीची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार आहे.

सोशल मीडियावर अनोळखी अकाउंटच्या माध्यमातून फोटोचा गैरवापर होण्याचे प्रकार लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्या नावाने बनावट अकाउंट आढळल्यास त्याचे स्क्रीनशॉट आणि संबंधित पुरावे जतन करून सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.

nndlivenews@gmail.com

NND LIVE NEWS is a Marathi digital news platform with 3 years of journalism experience, delivering fast, accurate, and reliable news from across Maharashtra. We cover breaking news, crime, politics, social issues, and important events with a commitment to truth, transparency, and fearless journalism. NND LIVE NEWS – Fearless Journalism, Standing with the Truth!

सर्व लेख पहा

तुमची प्रतिक्रिया द्य NND LIVE NEWS

Your email address will not be published. Required fields are marked *