११ वर्षीय मूकबधिर बालक निवासी विद्यालयातून बेपत्ता; माळेगाव पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
बारामती प्रतिनिधी: तालुक्यातील कऱ्हावागज येथील निवासी मूकबधिर विद्यालयातून ११ वर्षीय मूकबधिर बालक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण उर्फ राजन (वय ११, पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) हा बालक कऱ्हावागज येथील श्री यशोदिप कला, क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालयात दाखल झाला होता. ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
बेपत्ता बालक मूकबधिर असून बोलता व ऐकू येत नाही. त्याचा रंग गोरा, उंची सुमारे ४ फूट ६ इंच असून अंगाने मजबूत आहे. त्याच्या हातात लाल रंगाची राखी असून त्याने रंगीबेरंगी चौकडा शर्ट आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केली होती.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सय्यद यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार मोहोळे तपास करीत आहेत.
बेपत्ता बालकाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
