मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 4 October 2026
NND Live News: ई-पेपर व्ह्यू
मुख्य संपादक: सनी पटेल
ईमेल: contact@nndlivenews.in
वेबसाईट: nndlivenews.in

NND LIVE NEWS

निष्पक्ष, अचूक आणि वेगवान बातम्या

डिजिटल बातमी ई-पेपर
तारीख: 04 October 2026 वेळ: 6:45 AM
महाराष्ट्र

कोळगाव माळचारी येथील जिल्हा परिषद शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?; शाळेजवळ सूचना फलक लावण्याची पालकांची मागणी

04 October 2026 | प्रतिनिधी: nndlivenews@gmail.com

निफाड प्रतिनिधी: विंचूर ते कोळगाव मार्गावरील कोळगाव माळचारी येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेजवळ शाळेचा सूचना फलक नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा परिसरात तातडीने सूचना फलक लावण्यात यावा, अशी मागणी पालक आणि स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

कोळगाव, ता. निफाड येथील विंचूर ते कोळगाव हा रस्ता शिर्डीकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या रस्त्याचा वापर शिर्डीला जाणारे साईभक्त तसेच गुजरातकडून पायी प्रवास करणाऱ्या दिंड्यांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्यावर विविध वळणांवर तसेच शाळांच्या परिसरात वाहनचालकांना सावध करण्यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र, कोळगाव माळचारी येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेजवळ अद्याप शाळेचा सूचना फलक लावण्यात आलेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या शाळेच्या आवारात सध्या बालवाडीही सुरू आहे. त्यामुळे येथे लहान मुलांची नियमित ये-जा असते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी अचानक रस्त्यावर येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना जवळच शाळा असल्याची माहिती न मिळाल्यास अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

शाळेच्या परिसरात सूचना फलक असल्यास वाहनचालकांना आधीच सावध होता येईल आणि वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. मात्र, फलकच नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या  दृष्टीने शाळेजवळ सूचना फलक लावणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालक आणि स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहायची का? असा सवाल उपस्थित करत संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कोळगाव माळचारी येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेजवळ तातडीने सूचना फलक बसवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

© NND Live News | सर्वाधिकार सुरक्षित MIB & PIB Email Intimated Digital Portal