मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 22 November 2026
NND Live News: ई-पेपर व्ह्यू
मुख्य संपादक: सनी पटेल
ईमेल: contact@nndlivenews.in
वेबसाईट: nndlivenews.in

NND LIVE NEWS

निष्पक्ष, अचूक आणि वेगवान बातम्या

डिजिटल बातमी ई-पेपर
तारीख: 04 November 2026 वेळ: 4:06 AM
क्राइम

बारामतीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गंभीर प्रकार; आरोपीला अटक!

04 November 2026 | प्रतिनिधी: nndlivenews@gmail.com

शाळेत ये-जा करताना धमकावून अत्याचार केल्याचा आरोप; मुलगी गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघडकीस, वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणात मुलगी गर्भवती झाल्यानंतर संपूर्ण घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी निरगुडवाडी येथील सतीश मोहिते याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याने ती शाळेत ये-जा करीत असताना रस्त्यात अडवून तिच्याकडे मैत्रीची मागणी केली. मात्र, मुलीने नकार दिल्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला स्वतःच्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती झाल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती आणि फिर्याद प्राप्त होताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(m), ६५(१), ७८, ३५१(२), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव निंबाळकर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित आरोपी सतीश मोहिते याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाळेत ये-जा करताना विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पालक, शाळा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होत आहे.

© NND Live News | सर्वाधिकार सुरक्षित MIB & PIB Email Intimated Digital Portal