बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई; एकाच दिवशी दोन मटका अड्ड्यांवर छापे

बारामती प्रतिनिधी : बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीन स्वतंत्र ठिकाणी कारवाई केली. यामध्ये दोन ठिकाणी सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले, तर शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पानगली परिसरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. या कारवाईत अभिजीत किशोर शिंदे (वय २७, रा. पानगली, बारामती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५६० रुपये रोख रक्कम, मटका जुगारासाठी वापरण्यात येणारी स्लीप बुक, आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि लेखनसाहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५४/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर पोलिसांनी सटवाजीनगर येथील न्यू टी हाऊस परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावरही कारवाई केली. या ठिकाणी चंदन अशोक खुलसे (वय २५, रा. प्रबुद्धनगर, आमराई, बारामती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६१० रुपये रोख, दोन स्लीप बुक, जुगाराच्या आकड्यांच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या आणि लेखनसाहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरही कारवाई केली. माळेगाव कॉलनी, शारदानगर येथील आर.जी. ट्रेडर्स या दुकानात शारदाबाई पवार महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवून विक्री केली जात असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी रविंद्र मोहनलाल गायकवाड (वय ३८, रा. देवगिरी पार्क, जामदार रोड, कसबा, बारामती) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात खटला रजि. नं. ०६/२०२६ दाखल करण्यात आला असून सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने नियंत्रण कायद्याच्या कलम ६(ब) व शिक्षा कलम २४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, सट्टा, जुगार, अवैध दारू, ताडी-माडी, गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री, ऑनलाइन जुगार तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री यासह कोणताही अवैध धंदा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.
शहरातील नागरिक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, माजी व विद्यमान नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी तसेच जागरूक नागरिकांनी शहरात कोणताही अवैध धंदा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ डायल ११२ किंवा बारामती शहर पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शक्य असल्यास संबंधित ठिकाणाचे अचूक लोकेशन, फोटो किंवा व्हिडिओ सुरक्षित अंतरावरून पोलिसांना उपलब्ध करून द्यावेत. मात्र नागरिकांनी स्वतः संबंधित व्यक्तींशी वाद घालू नये किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. प्राप्त माहितीची पोलिसांकडून पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. विश्वासार्ह माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख आवश्यकतेनुसार गोपनीय ठेवण्यात येईल.
“अवैध धंदा दिसला तर दुर्लक्ष करू नका—डायल ११२ वर माहिती द्या. माहिती नागरिकांची, पडताळणी पोलिसांची आणि कारवाई कायद्याची. कायद्यापुढे सर्व समान असून अवैध धंद्यांना बारामती शहरात थारा नाही,” असा संदेश बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.
