पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर वॉरंटधारक आरोपी कसबा परिसरातून जेरबंद

बारामती प्रतिनिधी : तब्बल पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला टाळाटाळ करत पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या वॉरंटधारक आरोपीला अखेर बारामती शहर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. देवेंद्र रामचंद्र घोडके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला कसबा, बारामती परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
ही कारवाई बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये सन २०२१ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकीच्या गुन्ह्यातील न्यायालयीन प्रकरणासंदर्भात करण्यात आली. आरोपी न्यायालयीन प्रक्रियेस नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. वारंवार प्रयत्न करूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्याचा सातत्याने शोध सुरू होता.
बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४२/२०२१ अंतर्गत भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास खंडोबानगर परिसरात ये-जा करण्याच्या रस्त्यावर ठेवलेल्या भांड्यांच्या लोखंडी रॅकवरून वाद निर्माण झाला होता.
फिर्यादीच्या आरोपानुसार, वाद वाढल्यानंतर आरोपीने कुकरने डोक्यात मारहाण केल्याने जखम होऊन रक्तस्त्राव झाला. त्यानंतर शिवीगाळ व धमकी देण्यात आली. फिर्यादीची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता आरोपी लोखंडी कोयता घेऊन फिर्यादीच्या दिशेने धावून आल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपीविरुद्ध न्यायालयाचे वॉरंट प्रलंबित असल्याने पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी आणि पोलीस हवालदार उदय टापरे हे सातत्याने त्याचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी कसबा परिसरातील रस्त्यावरून जाणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी परिसरात सापळा रचला. आरोपी दिसताच त्याला पुन्हा पसार होण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची ओळख आणि न्यायालयीन वॉरंटची पडताळणी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपीला आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याला कारागृहात पाठविण्यात आले.
या कारवाईतून बारामती शहर पोलिसांनी न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, समन्स आणि वॉरंट हे केवळ कागदपत्र नसून न्यायालयाचे आदेश आहेत. वॉरंट टाळून कायद्यापासून कायमची सुटका होऊ शकत नाही.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे आणि महिला पोलीस शिपाई भाग्यश्री देवकाते यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
बारामती शहर पोलिसांकडून प्रलंबित वॉरंटधारक, फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्याची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
“पाच वर्षे हाती लागला नाही; पण कायद्याच्या नजरेतून सुटला नाही!”
