मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 22 November 2026

पितळेचे बिस्कीट देऊन महिलेचे साडेचार लाखांचे सोने लुटले; बीडमधून आरोपी जेरबंद

nndlivenews@gmail.com वार्ताहर
October 4, 2026 1 मिनिट वाचन 27 वाचन

शिक्रापूर प्रतिनिधी,  दि. ४ : महिलेशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन करायचा, सोन्याच्या बिस्कीटाचे आमिष दाखवायचे आणि त्यानंतर तिच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करायचे, अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी बीड जिल्ह्यातून अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) या २८ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जात होत्या. त्यासाठी त्या शिक्रापूर येथील चाकण चौकात वाहनाची वाट पाहत थांबल्या होत्या. याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधत गोड बोलण्यास सुरुवात केली. बोलता बोलता त्याने दरेकर यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना आपल्या मागे येण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपीने दरेकर यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळील झाडाखाली नेले. तेथे बोलण्याच्या ओघात त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या कट करून तसेच गळ्यातील सोन्याची पानपोत काढून घेतली.

दागिने घेतल्यानंतर आरोपीने दरेकर यांच्या हातात सोन्यासारखे दिसणारे पितळेचे बिस्कीट ठेवले. हे बिस्कीट त्यांच्या सोन्यापेक्षा अधिक वजनाचे असल्याचे सांगून त्याने त्यांची दिशाभूल केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

काही वेळाने बिस्कीट सोन्याचे नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे दरेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) आणि ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. उपलब्ध फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिस पथकाने बीड जिल्हा गाठला. तेथून अभिमान तुपे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीकडून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची पानपोत असे एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे आणि शिवाजी चितारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

महिलेचा विश्वास संपादन करून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्यानंतर आरोपी बीड जिल्ह्यात गेला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिक्रापूर पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. या कारवाईत फसवणूक करून नेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आता या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

nndlivenews@gmail.com

NND LIVE NEWS is a Marathi digital news platform with 3 years of journalism experience, delivering fast, accurate, and reliable news from across Maharashtra. We cover breaking news, crime, politics, social issues, and important events with a commitment to truth, transparency, and fearless journalism. NND LIVE NEWS – Fearless Journalism, Standing with the Truth!

सर्व लेख पहा

तुमची प्रतिक्रिया द्य NND LIVE NEWS

Your email address will not be published. Required fields are marked *