सोमेश्वरमध्ये सुनेत्रा पवारांना मोठं आव्हान! राष्ट्रवादीतच बंड, स्वतंत्र पॅनेलमुळे निवडणुकीला नवं वळण

बारामती प्रतिनिधी : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने बारामतीच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलसमोर विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने थेट राजकीय आव्हान निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, जगताप यांच्या स्वतंत्र भूमिकेपूर्वी त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत आणि त्यानंतर स्वतंत्र पॅनेलची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, प्रचारसभेत सुनेत्रा पवार यांनी विरोधकांनी अजित पवारांचे नाव आणि फोटो वापरू नयेत, तसेच स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले. या वक्तव्याला पुरुषोत्तम जगताप यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
त्यामुळे आता सोमेश्वर कारखान्याची निवडणूक ही केवळ पॅनेलची लढत राहिलेली नसून, राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावरही संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे.
एका बाजूला सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल, दुसऱ्या बाजूला पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र पॅनेल आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पॅनेल—अशा तिरंगी लढतीकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
आता सोमेश्वरचे सभासद विकास, कारखान्याचा कारभार आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावर नेमका कोणता कौल देतात, हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
