वडगाव निंबाळकर पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वडगाव निं प्रतिनिधी: वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर पोलिसांनी कारवाई करत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण १ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता मौजे कोहाळे बु., ता. बारामती, जि. पुणे येथील कठीणपुल ते लाटे रोडवरील फॉरेस्टलगतच्या मोकळ्या जागेत काही जण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान १३ पानी नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना विशाल उदयसिंह साळवे, आकाश संजय साळवे, मयुर महेंद्र अहिवळे आणि राहुल सुधाकर यादव, सर्व रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे, हे मिळून आले.
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ₹१,६५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१६/२०२६ नुसार मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स पो नि जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पन्हाळे, खेडकर, चौधरी तसेच पोलीस शिपाई येटाळे आणि धोत्रे यांनी केली.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध यापुढेही प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले
