इन्स्टाग्रामवरील भाईगिरी पडली महागात; पिस्तूलसदृश वस्तूसह रील पोस्ट करणाऱ्या तरुणावर गुन्हा

सुपा | प्रतिनिधी
सोशल मीडियावर प्रसिद्धी, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी घातक शस्त्रांचे प्रदर्शन करून रील्स बनवणाऱ्या तरुणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या सायबर मॉनिटरिंग पथकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका प्रक्षोभक व्हिडिओची गंभीर दखल घेत संबंधित तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायबर पेट्रोलिंगदरम्यान ‘prem_jagtap_0295’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी (ता. बारामती) येथील रहिवासी प्रेम प्रताप जगताप हा पिस्तूलसदृश वस्तू हातात घेऊन दिसत होता. व्हिडिओमध्ये “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर वापरण्यात आला होता. तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानून भी अपना है” अशा प्रक्षोभक व धमकीवजा शब्दांचा वापर करण्यात आला होता.
याशिवाय, व्हिडिओच्या ऑडिओमध्ये एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा संदर्भ देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
सध्या पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू आहेत. या आदेशांचे उल्लंघन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी प्रेम जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंके आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
सोशल मीडियावर हत्यारांचे प्रदर्शन करून खोटी भाईगिरी दाखवणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांना कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे. अशा गुन्ह्यांमुळे पोलीस चारित्र्य पडताळणी, शासकीय व खासगी नोकरी तसेच पासपोर्ट प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रसिद्धीच्या नादात कायद्याचे उल्लंघन टाळावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
