मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026

पोलिसांसमोरच हायवा पळवला! मुरुम खाली ओतून आरोपी फरार; बिडकीनमध्ये चौघांवर गुन्हा

nndlivenews@gmail.com वार्ताहर
September 23, 2026 1 मिनिट वाचन 6 वाचन

बिडकीन प्रतिनिधी , दि. २३ सप्टेंबर : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील डीएमआयसी परिसरात बेकायदेशीर मुरुम वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोरच हायवा पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारवाई टाळण्यासाठी पोलिसांच्या वाहनाचा मार्ग अडवण्यात आला. त्यानंतर हायवा मालकाने ट्रकमधील मुरुम रस्त्यालगत खाली ओतून वाहन घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीएमआयसी परिसरात जेसीबीच्या सहाय्याने मुरुम उत्खनन करून त्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस हवालदार वाल्मिक निकम आणि वाजेद शेख यांनी निलजगाव रोडवर कारवाई करत ‘जय भवानी’ असा उल्लेख असलेला हायवा थांबवला.

तपासणीदरम्यान हायवामध्ये सुमारे ६ ब्रास मुरुम आढळून आला. मात्र, त्याची रॉयल्टी उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीत चालक प्रसाद मुळे याने हा मुरुम निलजगाव येथील वसीम शेख यांच्या जेसीबीच्या सहाय्याने भरल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

हायवा ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ऋषी गवारे हा स्विफ्ट कार घेऊन घटनास्थळी आला. त्याने पोलिसांच्या वाहनासमोर कार उभी करून मार्ग अडवल्याचा आरोप आहे. काही वेळाने हायवा मालक सचिन गवारे हा थार वाहनातून घटनास्थळी पोहोचला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सचिन गवारे याने हायवा स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र, ट्रक सुरू केल्यानंतर त्याने डीएमआयसी परिसरातच हायवाचा हायड्रॉलिक फाळका वर करून त्यातील मुरुम खाली केला आणि त्यानंतर हायवा घेऊन पळ काढला.

पोलिसांनी मोटारसायकलवरून हायवाचा पाठलाग केला. मात्र, चालक वाहनासह फरार होण्यात यशस्वी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनास्थळी मुरुम टाकण्यात आलेल्या ठिकाणाचे अक्षांश-रेखांश नोंदवून पोलिसांनी पुरावे संकलित केले आहेत.

या प्रकरणी पोलिस हवालदार वाल्मिक निकम यांच्या फिर्यादीवरून प्रसाद मुळे, सचिन गवारे, ऋषी गवारे आणि वसीम शेख या चौघांविरुद्ध बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच खाण व खनिज अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सोमनाथ जाधव करीत आहेत.

nndlivenews@gmail.com

NND LIVE NEWS is a Marathi digital news platform dedicated to providing fast, accurate and reliable news from Baramati, Pune, Maharashtra and across India. Our mission is to bring truth to the people through fearless journalism, covering local news, breaking news, crime news, political updates, social issues and important events. We believe in responsible journalism, transparency and giving a voice to the common people. NND LIVE NEWS – निर्भीड पत्रकारिता, सत्याची साथ!

सर्व लेख पहा

तुमची प्रतिक्रिया द्य NND LIVE NEWS

Your email address will not be published. Required fields are marked *