वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ सराईत गुन्हेगार जेरबंद, 11.89 लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामती | प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने जबरी चोरी व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह दोन मोटारसायकली असा एकूण 11 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानडवाडी परिसरातील एका महिलेकडील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जबरी चोरी व दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
या कारवाईत राज मिशुन शिंदे, सनी रमण भोसले, पवन संडल काळे आणि बापूराव भाऊदास चोपडे यांना अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान वडगाव निंबाळकर, जेजुरी, वालचंदनगर, यवत, बारामती शहर, फलटण शहर व लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्वागत केले असून, गुन्हेगारीविरोधातील अशा कठोर कारवायांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
